शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर येथील पाबळ चौकाजवळ दुचाकी चालकाने पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाहतूक पोलिसाने एका व्यक्तीला दुचाकीला नंबरप्लेट का नाही, वाहन चालवण्याबाबत परवाना आहे का, असे विचारत पोलिस स्टेशनमध्ये आणले. याच रागातून दुचाकी चालकाने पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस शिपाई ज्ञानदेव दत्तात्रय गोरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सोमेश्वर आनंद वाघ (वय-४६, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) या दुचाकीचालकावर शिवीगाळ, दमदाटी, मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई ज्ञानदेव गोरे हे २८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास पाबळ चौक परिसरात वाहतूक नियमनाचे काम करत होते. यावेळी एमएच १२ बीएस ६७४६ या दुचाकीवरून जात असताना गोरेंना त्यांचा धक्का लागला. दरम्यान, दुचाकी चालकाला तुझ्या दुचाकीला नंबर का नाही, दुचाकी चालवण्याचा परवाना आहे का, असे विचारले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर तू माझ्याशी वाद घालू नको, पोलिस स्टेशनला चल, असे म्हणून गोरेंनी त्या दुचाकीचालकाला पोलिस स्टेशनमध्ये आणले. गोरे पुन्हा वाहतूक नियमनाच्या कामासाठी बाहेर आले.
यावेळी पाठीमागून दुचाकीचालक सोमेश्वर वाघ आला आणि शेजारील हॉटेलमधील खुर्ची घेऊन मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलचालक अशोक तकते यांनी सदर व्यक्तीला पकडले आणि पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये आणले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.