पुणे : सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी २२ फेब्रुवारीला पुण्यातील वडगवा शेरी येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडली आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ४८ वर्षीय नराधम सावत्र बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा सावत्र बाप आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलगी अंघोळ करुन झाल्यावर किचनमध्ये कपडे बदल होती. त्यावेळी आरोपी बापाने किचनचा दरवाजा वाजवून जेवण करायचे आहे असं सांगितले. मुलीने कपडे बदलल्यानंतर दरवाजा उघडला.
त्यावेळी आरोपी बापाने किचनमध्ये येऊन पीडित मुलीला शिवीगाळ करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. तसेच तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने आरडा ओरडा केला. त्यावेळी तिची आई आणि शेजारी किचनमध्ये आले. आरोपीने मुलीला आणि तिच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागवडे करत आहेत.