पुणे : पुण्यातील खडकवासला येथे १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेऊन लग्न केलं. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले. यानंतर घरासाठी मुलीचा छळ करुन तिचा गर्भपात केला. हा प्रकार सन २०१९ पासून ३० जानेवारी २०२४ या कालावधीत खडकवासला येथील मुलीच्या सासरी घडला. याप्रकरणी पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत २० वर्षाच्या पीडितेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती विश्वास राजेंद्र ताकतोडे (वय-२५), सासरे राजेंद्र माणिकराव ताकतोडे (वय-६०) दीर ओंकार राजेंद्र ताकतोडे (वय-२२), सासू महानंदा ताकतोडे (वय-५०), नणंद विद्या कांबळे (वय-२५ सर्व रा. सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी विश्वास ताकतोडे याने फिर्यादी मुलगी अल्पवयीन असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून आरोपीने २०१९ मध्ये मुलीला येरवडा येथील घरातून पळवून नेले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले.
लग्नानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर तिच्या आईचे राहते घर नावावर करुन द्यावे यासाठी आरोपींनी मुलीला सतत मारहाण केली. दरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर असताना घर नावावर करुन देण्यासाठी सासरा आणि दिराने मुलीला मारहाण केली. यामुळे मुलीचा गर्भपात झाला. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ, मारहाण करुन जाळून मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.टी. कांबळे करत आहेत.