हिंजवडी : हिंजवडी परिसरातून पोलीस असल्याची बतावणी करुन 2 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण करुन त्याला फलटण येथे डांबुन ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जांबे येथील कोलते पाटील सोसायटीमध्ये घडला. याप्रकरणी दोन आरोपीना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शुभम यशवंत कुलकर्णी (वय-21, रा. लिगसी मिलिनिया सोसायटी, गायकवाडनगर, पुनावळे) यांनी मंगळवारी (दि. 3) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून योगेश विश्वास सावंत (वय-34, रा. राऊतनगर, अकलूज, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय-26, रा. मगरवस्ती खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आले आहे. आरोपींकडून ८ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपीना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळाजवळील तसेच टोलनाक्यावरील ७०-८० सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले.
दरम्यान, आरोपी हे माळशिरस (जि. सोलापूर) येथील असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे एक टीम माळशिरस येथे रवाना करण्यात आली होती. पोलीस उप निरीक्षक सुनिल भदाणे व टीमने स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपी ज्ञानेश्वर घाडगे याला खंडाळी (ता. माळशिरस) येथून, तर योगेश सावंत अकलूज येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केला असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट कार आणि 2 मोबाईल फोन असा एकुण ८ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी ज्ञानेश्वर घाडगे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन सोलापूर येथे गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच निष्पन्न आरोपीवर देखील खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत अॅट्रोसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे- 2) बाळासाहेब कोपनर, यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे यांचे पथकाने केली.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी व त्यांचा मित्र अभ्युदय चौधरी हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तसेच आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी 50 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, एक लाख 25 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 15 हजारांचे घड्याळ असा ऐवज मारहाण करून काढून घेतला.