पुणे : उसने घेतलेले पैसे अनेकदा मागूनही परत न केल्याच्या कारणाने चौघांनी उंड्रीमधून एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढवा पोलिसांनी त्याचा शोध घेऊन माळशिरस येथून त्याची सुटका केली. अपहरण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
सुरज राजेंद्र मोरे (रा. कात्रज), विक्रमसिंग लक्ष्मणराव पाटील आणि प्रसाद कुलकर्णी (दोघे रा. माळशिरस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत माधुरी घनश्याम मोरे (वय ३१, रा. गोदरेज ग्रीन्स, उंड्री) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमित आप्पासाहेब चव्हाण (वय ३२) यांनी वसुधा तुकाराम जगताप यांच्याकडे पैसे घेतले होते. ते अनेक दिवस परत न केल्याने त्यांच्यात वादविवाद होत होते. सूरज मोरे व त्याचे तीन साथीदार १० फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या घरी आले. त्यांनी अमित यांना बाहेर बोलावले व त्यांचे अपहरण केले.
दरम्यान, माधुरी मोरे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. कोंढवा पोलिसांनी तातडीने याची दखल घेऊन तपास सुरु केला. तेव्हा अमित मोरे यांना लातूर येथील एका पत्र्याच्या खोलीत डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथक तातडीने रवाना झाले. अपहरणकर्त्यांनी त्यांना माळशिरस येथे नेले. पोलिसांनी तेथे त्यांचा शोध घेऊन मोरे यांची सुटका केली व तीन अपहरणकर्त्यांना अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, सुजित मदन, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.