पुणे : पिंपरी-चिंचवड शहरामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या पतीनेच आपल्या पत्नीचं भरदिवसा अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेलं. तसेच दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देऊन गाडीतचं डांबून ठेवण्यात आलं. कशीबशी सदर महिलेने स्वतःची सुटका करून थेट वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत हा प्रकार सांगितला. सुमित शहाणे असं या पतीचं नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट २०२३ मध्ये या दोघांचं लग्न झालं आहे. मात्र आठवडाभरातच पतीने नको त्या मागण्या सुरू केल्या. त्याने ज्या मागण्या केल्या त्या पत्नीला आवडल्या नाहीत. त्यामुळे पत्नीने सुमितपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीने मुंबईमध्ये मैत्रिणीकडे जाऊन काही महिने राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीकरीता पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये आली.
येथे तिने एका बांधकाम व्यवसायिकाकडे काम करण्यास सुरुवात केली. पत्नी येथे आल्याची माहिती मिळताच सुमितने तिच्या ऑफिसचा पत्ता शोधून काढला. १९ जून रोजी सुमित आई आणि चालकासोबत पत्नीच्या वाकड येथील ऑफिसमध्ये आला. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास पत्नीला फरपटत नेत गाडीत बसवलं. त्यावेळी पत्नीचा मित्र ही जबरदस्तीने गाडीत बसला.
त्यानंतर ते सगळे गाडीत बसून मंचरच्या दिशेने निघाले, थोडं अंतर पुढं गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि गाडीतून बाहेर ढकलून दिलं. त्यानंतर पुढे जाताना सुमितने पत्नीला भुलीच इंजेक्शन देऊन गाडीतच डांबून ठेवलं. जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा तो तिला वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा, असा आरोप पत्नीने केला आहे.
२० जूनला दुपारी तिने सुमितला विश्वासात घेऊन तो सांगेल त्या कागदपत्रांवर सही करते, असं ती म्हणाली. त्यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली, मात्र, माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा पत्नीने केला. त्यानंतर ते दोघेही एका मंदिरात थांबून राहिले. त्यावेळी पत्नीने एका तरुणाला खुनवत, मदतीची मागणी केली.
त्यावेळी तरुणाला काहीतरी गडबड असल्याचं समजताच त्याने मंचर पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान, आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपस मंचर पोलीस करत आहेत.