खेड : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील अनाथ आश्रमातून दोन चिमुरड्या मुलांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल तीन महिने होऊनही या मुलांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. १६ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास संबंधित दोन्ही मुले बेपत्ता झाली. राहुल शिवराम मुकणे (वय ९) व अजय मारुती पवार (वय १०) अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १६ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास शेलपिंपळगाव आश्रमातील मुले खेळत असताना सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ही मुले आश्रमातून अचानक बाहेर गेली; मात्र ती पुन्हा परतली नाहीत. आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु या मुलांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
आश्रमातील इतर मुलांकडे चौकशी केली असता काहीही माहिती मिळून आली नाही. त्यामुळे या मुलांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलिस करीत आहेत.