पुणे : पुण्यात अनेक प्रसिद्ध व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आहेत. विशेष म्हणजे नॉनव्हेज जेवणासाठी पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलची विशेष चर्चा असते. त्यामुळे पुणेकर या हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी करतात. त्यापैकी बागबान हॉटेल देखील नेहमी चर्चेत असते. मात्र याच हॉटेलची आता मटणाचे पैसे दिले नसल्याने झालेल्या फसवणूक केल्याप्रकरणी चर्चा होत आहे. मटणाची तब्बल ६१ लाखांची उधारी थकवून फसवणूक केल्यामुळे पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बागबान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे बागबान हे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलच्या मालकानेच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
हॉटेल मालकाने हॉटेलसाठी मटन, खिमा, चाप, गुर्दा असे मटणाचे विविध प्रकार मागवले. परंतु त्याचे पैसे न देता फसवणूक केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मटण विक्रेत्याने अखेर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही प्रसिद्ध बागबान हॉटेलचे मालक आहेत.
पीडित फिर्यादीचे (वय ३५) पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट येथे मटणाचे दुकान आहे. त्यांच्या मटणाच्या दुकानांमधून बागवान बंधूंनी ६१ लाखांचे मटन,चाप, खिमा आणि गुर्दा अशा मटणाचे वेगवेगळे प्रकार घेतले, मात्र त्याचे पैसेच दिले नाहीत. या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.