Aashadhi Vari इंदापूर : धन्य आज दिन संत दर्शनाचा | अनंत जन्माल क्षीण गेला | या अभंगाच्या ओळीप्रमाणे निमगावकरांच्या मनी भाव होता. (Aashadhi Vari) टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज निमगाव केतकी येथे सायंकाळी आगमन झाले. (Aashadhi Vari)
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम काल अंथर्णे येथे होता. काकड आरतीनंतर पालखी सोहळा विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीकडे प्रस्थान झाला. आमदार दत्तात्रय भरणे हे त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांच्यासह उपस्थित होते. अंथर्णे गावकऱ्यांचा पाहुणचार घेऊन पालखी सोहळा सव्वा पाच वाजता निमगाव केतकीमध्ये दाखल झाला.
निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रवीण डोंगरे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत ‘निर्मळ वारी हरित वारी’च्या माध्यमातून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्लास्टिकमुक्त गाव, प्रदूषणमुक्त वारी, वैद्यकीय पथके पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. पाणी, वीज, कचराकुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचनाफलक अशी व्यवस्था करण्यात आली, ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक आबा जगताप यांनी दिली.
निमगाव केतकी या ठिकाणी चौका-चौकात विविध पतसंस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष कमानी, मंडप उभारले गेले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरविल्या गेल्या.
निमगाव केतकीत अनेक संस्था व नागरिकांकडून अन्नदान
मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शीर खुर्मा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे धार्मिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. अष्टविनायक पतसंस्था, सिद्धिविनायक पतसंस्था देवराज पतसंस्था, मयुरेश्वर पतसंस्था, अष्टविनायक ग्रुप, सोपानराव चॅरिटेबल ट्रस्ट, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था, केतकेश्वर पतसंस्था, सुवर्णयुग पतसंस्था, त्याचप्रमाणे कुंडलिक कचरे, सुनील खामगळ मित्र परिवाराच्या वतीने हजारो वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली.