पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची ७ फेब्रुवारीला नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे. मात्र, दिवसे यांच्या नियुक्तीवर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला असून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सुहास दिवसे हे मागील चार वर्षांपासून पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणुक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत, त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी आयोगाकडे केली आहे. दिवसे यांच्यासह इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवर देखील आक्षेप घेण्यात आला असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
दिवसे हे जुलै २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सप्टेंबर २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान पुण्यात राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ७ फेब्रुवारीला पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली. तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी, असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. दिवसे यांच्या बदलीमुळे या नियमाचा भंग झाला आहे. किंवा निवडणूक आयोगाचा नियम डावलून दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली असे दिसत आहे. त्यातच सुहास दिवसे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पदावर झाल्याने तेच जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान, २१ डिसेंबर २०२३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्याचे निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात झाला असेल, मात्र संबंधित अधिकारी निवडणुकीची संबंधित काम करणार नसेल, तर तो जिल्ह्यात राहू शकतो.
तसेच भविष्यात अशा अधिकाऱ्याकडे निवडणुकीशी संबंधित काम देण्यात येऊ नये, अशी अट केंद्रीय निवडणूक आयोगाने घातलेली आहे. याच अटीचे उल्लंघन दिवसे यांची बदली करताना झाले आहे. दिवसे जवळपास चार वर्षे पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. आता त्यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असणार आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे आपचे नेते विजय कुंभार यांनी सांगितले.