Aaditya Thackeray Konkan Visit : पुणे : आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. त्यासाठी ते काल रात्रीच कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले होते. या दौऱ्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात बैठका घेणार आहेत. ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. त्यासाठी ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत खळा बैठक घेणार आहेत.
खळा बैठक म्हणजे काय?
घरासमोर असणाऱ्या अंगणाला कोकणात खळा असं म्हणतात. गावातील, घरातील किंवा वाडीतील कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो अंगणामध्ये म्हणजेच, खळ्यात बसून एकमुखी घेतला जातो. त्यामध्ये प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय घेतला जातो.
दौऱ्यासाठी जय्यत तयारी
हा दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गपासून सुरू होत आहे. यात खळा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात शेणानं सारवलेली जमीन आणि त्यावर रांगोळी काढून सजवलं आहे. या अंगणात खाली बसून या बैठका घेतल्या जाणार असल्यानं एक कुतूहल शिवसैनिकांमध्ये आहे. त्यासोबत आदित्य ठाकरेंसाठी मालवणी खाद्य पदार्थ बनवून महिला कार्यकर्त्या त्यांचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी तयार आहेत.
कसा असेल 2 दिवस दौरा
आज गुरुवारी दोडा मार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबार्डे, बांबार्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबुडे असा आदित्य ठाकरेंचा दौरा असेल तर शुक्रवारी चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करत ठीक ठिकाणी या खळा बैठका घेतल्या जातील. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत हा दौरा असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांची देखील यातून पेरणी केली जात असल्याचं जाणकार सांगतात. कोणतीही जाहीर सभा न घेता तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला आणि खळा बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.