यवत : यवत गावातील ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या आधारकार्ड केंद्र चालकांकडून नागरिकांची लूट होत आहे. शासन निर्णयाप्रमाणे लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, येथील आधारकार्ड चालक हे बालकाचे आधारकार्ड काढण्यासाठी १६० रुपये रकमेची आकारणी करत आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे.
देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड ही मूलभूत गरज असल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड काढणे अनिवार्य झाले आहे. सरकारी योजनांचा लाभ, बँका, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी आधार कार्डची सक्ती केली जात आहे. आधार नसेल, तर शासकीय योजनांच्या लाभांपासून निराधार राहावे लागते आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी आधारची मागणी केली जाते. त्यातच आधारकार्डवरील किरकोळ बदलासाठी मोबाईल नंबर, पत्ता आणि नाव अपडेट करण्यासाठी नागरिक आधार केंद्रावर जातात.
मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी अंगणवाडी अंतर्गत पंचायत समितीमार्फत आधार कार्ड केंद्र यवत परिसरात ग्रामीण रुग्णालय येथे दिले असून, सध्या अंगणवाडी बंद असल्याने येथील महा-ई-सेवा चालक आपल्या कार्यालयातच आधार कार्ड काढून देत आहे.
नागरिकांची होतीये आर्थिक लूट
शासन निर्णयाप्रमाणे लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, येथील आधारकार्ड चालक हे बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी १६० रुपये रकमेची आकारणी करत आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. आधार कार्ड नोंदणी केलेल्या पावतीवर असलेली रक्कम दर्शविणारा भाग आधार कार्ड चालक स्वतः काढून घेत असून, मोफत असलेल्या कार्डसाठी रकमेची आकारणी करत आहे.
आधारकार्डसाठी पैसे घेतले पण पावती मात्र नाही
याबाबत सेवानिवृत्त पोलीस चांदभाई मुलाणी यांनी सांगितले की, गुरुवारी (दि.११) माझ्या नातीचे आधार कार्ड काढण्यासाठी गेलो असता आधार कार्ड चालकाने १६० रुपयांची आकारणी केली. परंतु, याबाबतची कोणतीही पावती दिली नाही. यवत ग्रामीण रुग्णालय समोर असलेल्या आधार केंद्रांवर नागरिकांची होणारी लूट थांबली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
लेखी तक्रार करा…
दौंड येथील तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता याबाबत लेखी तक्रार करावी, असे सांगण्यात आले. तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के. धुमाळ यांच्याशी संपर्क केला असता हे आधार कार्ड केंद्र हे अंगणवाडीतील बालकांसाठी देण्यात आले असून, सध्या अंगणवाडी बंद असल्याने दुकानात आधार कार्ड नोंदणी चालू असल्याचे सांगितले. मात्र, लहान मुलांच्या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम आकारली जात नाही. याबाबत संबंधित केंद्रचालकाची चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करू, असे सांगितले.