पुणे : ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी मरुन जाईल,’ अशी धमकी देत तरुणीचा पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घातली. तरुणी मैत्रिणीला भेटून घरी जात असताना तिला रस्त्यात अडवून, शिवीगाळ करुन, तिच्या छातीवर लाथा मारुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. ७) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द येथे घडला.
याबाबत महंमदवाडी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने गुरुवारी (ता. ८) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन संतोष गुच्चप्पा कांबळे (वय-२३, रा. महंमदवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीचा वारंवार पाठलाग केला. ‘तुझ्याशिवाय माझे या जगात कोणी नाही. आपण दोघे लग्न करु, नाहीतर मी मरुन जाईल,’ अशी धमकी दिली.
दरम्यान, पीडित तरुणी बुधवारी तिच्या सोमजी गावातील मैत्रिणीला भेटून घरी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून ‘कुठे गेली होती’ अशी विचारणा केली. ‘मला विचारुन का गेली नाहीस?’ असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच तिच्या हातातील मोबाईल आपटून फोडून टाकला. एवढ्यावरच न थांबता, तरुणीच्या छातीवर लाथा मारुन तिला जखमी केले. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.