थेरगाव : थेरगाव मधील कासारसाई धरणावर पोहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एम एम ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकणारे पाच विध्यार्थी कासारसाई धरणावर फिरायला गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सारंग ढोलस (वय- 17, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, सारंग हा थेरगाव येथे राहण्यास होता. येथील एम एम ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकत होता. शुक्रवारी सारंग आणि त्याचे चार मित्र कॉलेजला सुट्टी घेऊन कासारसाई धरणावर फिरायला गेले होते. धरणातील पाण्यात उतरून पोहण्याचा मोह न आवरल्याने सारंग पाण्यात उतरला. आणि तो खोल पाण्यात गेला. तिथे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
सारंगच्या मित्रांनी तेथील स्थानिकांना माहिती दिली असता, स्थानिकांनी शिरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोनावळा या संस्थांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच निलेश गराडे, कुणाल दाभाडे, अविष्कार भिडे, सुशांत नगीणे, विकास दोड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत सारंग याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.