पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोसरी परिसरातील टोळक्यांकडून येरवडा कारागृहासमोर राडा घालण्यात आला. कारागृहातून बाहेर येत असलेल्या मित्रांना भेटण्यास आलेल्या तरुणांना टोळक्याने अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच परिसरात दहशत माजवत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ऋषिकेश सुनील घोरपडे (वय १८, रा. मोहननगर, भोसरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मयूर ऊर्फ यम सरोदे (रा. भोसरी), ज्ञानेश्वर लोंढे, यदू (तिघेही रा. गौडावून चौक, भोसरी) यांच्यासह त्यांच्या ५ ते ६ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर लोंढे यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋऋषिकेश घोरपडे यांचा मित्र येरवडा कारागृहातून बाहेर येणार होता. त्यामुळे ते त्याला घेऊन जाण्यासाठी तेथे आले होते. दरम्यान, तेव्हा मागावर असलेल्या मयूर ऊर्फ यम आणि त्याचे साथीदार देखील त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी ऋषिकेश यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला, तुला आता सोडणार नाही, अशी धमकी दिली. दुचाकीवर घेऊन ते मनोरुग्णालयापर्यंत आले देखील. तेथे घोरपडेला बेदम मारहाण करून टोळके तेथून पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.