पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मला कामावर काढले, आता तूही कामावर जायचे नाही, असे सांगुन देखील न ऐकल्याने तरुणाच्या पोटात चाकू भोसकून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जुनी वडारवाडीतील पठाण यांच्या बिल्डिंग समोरील रोडवर शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी अजीम हमीद पठाण (वय-२४, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन नितेश बाबु मांजरेकर (वय-२८, रा. एस. के. कुसाळकर बंगल्यासमोर, जुनी वडारवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीम पठाण व नितेश मांजरेकर हे बावधन येथील वेंकीज येथे हेल्पर म्हणून काम करत होते. दोन तीन दिवसांपूर्वी नितेश याचा मॅनेजरसोबत भांडण झाल्याने नितेशला कामावरुन काढून टाकले होते. फिर्यादी हे घरी असताना नितेश फिर्यादीला म्हणाला की तू वेंकीजमध्ये कशाला कामाला जातो़, यावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर शुक्रवारी रात्री अजीम पठाण हे घरासमोर आले असताना नितेशने त्याला बोलावून घेतले. तू वेंकीजमध्ये कशाला कामाला जात आहेस, असं बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान फिर्यादी हे नितेश याला धक्का मारुन घरी जात असताना नितेश याने पँटचे खिशातून चाकू काढून पठाण यांच्या पोटात खुपसला. त्यामुळे पठाण खाली पडले. हे पाहून बाजूला असलेल्या फिर्यादी यांचा मित्र विशाल शिगवणे हा जोरात ओरडला. तेव्हा नितेश मांजरेकर हा पळून गेला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.