पुणे: प्रेमसंबंधातून तरुणाचे अपहरण त्याला जबर मारहाण केल्याची घटना पुणे येथे घडली आहे. आरोपींनी लाकडी दांडक्याने मारून तरुणाला गंभीर जखमी केले. 11 मार्च रोजी हि घटना 10 च्या सुमारास घडली आहे. ऋषिकेशला लाथाबुक्क्यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सुखसागरनगर ते नवले पुल व तेथून आंबेगाव बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत ऋषिकेश दीपक खोपडे (वय 26, रा. सुखसागरनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 11 मार्च रोजी खोपडे हे दुरुस्तीला दिलेला मोबाईल घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे आरोपी आला आणि त्याने खोपडे याला तू माझ्या बहिणीचे नादाला का लागला आहेस, तुला मी सोडणार नाही, असे म्हणून मारहाण केली.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी तपास करून प्रणव प्रशांत जगताप, सार्थक संतोष भोर, कुमार तुळशीराम भागवत आणि अमर अशोक लोंढे या तरुणावर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश खोपडेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीखक विकास बाबर तपास करीत आहेत.