पुणे : पुण्यामधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. कायदा व सुव्यस्था कुठे आहे असा प्रश्न पडू लागला आहे. अशातच वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप सुनील कवाळे (वय २७, रा. डाॅ आंबेडकर चौक, औंध रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत प्रदीप मोरे (वय ३८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) याला अटक करण्यात आली. याबाबत कवाळे याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवाळे आणि मोरे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कवाळे हा बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्याने निघाला असताना त्यावेळी आरोपी मोरेने त्याला साई मंदिरासमोर अडवले. त्याने त्याला शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कवाळेला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. हल्ला करून पसार झालेल्या मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.