-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर मधील तरुणावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी 4 लाख रुपयांची ‘सुपारी’ देण्यात आली होती. ही घटना शिरुर शहरात (दि. 30 सप्टेंबर) रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे.
शुभम मुत्याल, रंजना मुत्याल, जफर शेख, फैजल काझी अशी आरोपींची नावे आहेत.
शिरुर मधील प्रितम प्रकाश नगरमध्ये वरातीत झालेल्या वादातून फिर्यादी शुभम दत्तात्रय दळवी, (वय – 29 वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, प्रितम प्रकाश नगर, शिरूर ,ता – शिरुर, जिल्हा- पुणे) यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरात जानेवारी महिन्यामध्ये फिर्यादी शुभम दळवी हा त्याच्या ओळखीचा शुभम मुत्यालाकडे वराती करता आला होता. यावेळी फिर्यादीची आई अलका हिला पाहुन मुत्याल म्हणाला की, ‘तुझ्या पोराला लय मस्ती आली आहे. त्याला बघतो. गुन्ह्यातच अडकवतो ‘. त्यावेळी आई त्याला म्हणाली की, ‘तु दारु पिला आहेस. आपण सकाळी बोलू त्यावेळी शुभम मुत्याल याने आईचा हात धरुन धक्का दिला.
त्यानंतर फिर्यादीने त्याचा मित्र अभिषेक मिसाळ यास फोन केला व ‘आईस काय झाले आहे का ते पहा’ असे सांगितले. त्यानंतर मिसाळ हा तेथे गेला. तेथे त्याची व शुभम मुत्याल याची बाचाबाची झाली. त्यानंतर शुभम मुत्याल तिथुन निघुन गेला.
शुभम मुत्यालची आई रंजना मुत्याल हीने फिर्यादी शुभम दळवी याला रात्री व्हॉट्सअॅपवर फोन करून म्हणाली की, तु माझ्या मुलाबरोबर भांडण का करतोस? तुला माहिती आहे का आम्ही कोण आहोत? मी तुला मारुन टाकीन जर तु माझ्या मुलाची तक्रार केलीस तर !’. त्यानंतर त्या फोनवरुन पुरुषाचा आवाज आला. ‘काजी बोलतोय. जर तु तक्रार केली तर मी तुझा मर्डर करीन !’ असे म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर शुभम दळवी याच्या आईने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन शुभम मुत्याल व त्याची आई रंजना मुत्याल यांच्या विरोधात तक्रार केली होती.
त्यानंतर (दि. 30 सप्टेंबर) रोजी सकाळी 9: 30 वाजण्याच्या सुमारास शुभम दळवी हा त्याच्या पान टपरीवर काम करत असताना जफर शेख आणि फैजल काझी हे दोघे तेथे आले. त्यांनी सिगारेट मागितली. काउंटरच्या बाजुने जफर पान टपरी मध्ये आला. काझी हा काउंटर समोर होता. त्यावेळी जफर हा शुभमला म्हणाला,’ तुझा आज शेवटचा दिवस आहे. मी फैजल काझी आहे. मी सराईत गुन्हेगार आहे. मी आत्ताच मोक्का कायद्यातुन सुटुन आलो आहे. मी तुझी सुपारी शुभम मुत्याल व त्याची आई रंजना मुत्याल यांच्या कडुन चार लाख रुपये इतकी घेतली आहे. आज तुला मी संपवणार आहे.’ असे म्हणत त्याने त्याच्या कमरेला असलेली पिस्तोल शुभम दळवी याच्यावर ताणली.
शुभम आपल्या हाताने प्रतिकार करत असताना जफर शेख याने कोयता काढुन शुभम दळवी याच्या डोक्यात मारला. या झटापटीत पिस्तोल खाली पडले. यात कोयता शुभम च्या डाव्या हातावर मारला गेला. काझी मागे झाल्यावर शुभम आपल्या जवळील मित्र सागर पवार यांच्या मनी ट्रान्स्फरच्या दुकानात जावून दुकानाचे शटर खाली केले. नंतर स्थानिक नागरिक जमा व्हायला लागल्यानंतर ते दोघे तेथुन पळुन गेले. त्यानंतर शुभम दळवी याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले
वरील घडलेल्या घटनेचा जबाब फिर्यादी शुभम दळवी याने ससुनच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना दिला आहे. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शुभम मुत्याल, रंजना मुत्याल, जफर शेख, फैजल काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक गीरी हे करत आहेत.