लोणी काळभोर, ता. 11 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने चालेलेल्या एका कंटेनर दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना शेवाळवाडी फाटा (मांजरी,ता. हवेली) परिसरात रविवारी (ता.9) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.

सौरभ कैलास इंदलकर (वय -23 रा. कवडीपाट मांजरी फार्म, हडपसर पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ चा मामाचा मुलगा सुरज कदम (वय 18 , रा. कवडीपाट मांजरी फार्म, हडपसर पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनरवरील अज्ञात चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281,125(अ),337,106 (1), मोटार वाहन कायदा कलम 119/177,184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज कदम यांच्या आत्याच्या मुलाचे नाव सौरभ इंदलकर आहे. हे दोघे रविवारी रात्री दुचाकीवरून चालले होते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, त्यांची दुचाकी शेवाळवाडी फाटा येथे आली असता, त्यांच्या दुचाकीला कंटेनर चालकाने जोरदार धडक दिली. तसेच चालकाने अपघाताच्या ठिकाणी न थांबता, अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पळुन गेला. या अपघातात सौरभ इंदलकर हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मूत्यू झाला.
दरम्यान, कंटेनर चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, फिर्यादी सुरज कदम यांच्या मोटार सायकलला जबर ठोस मारली. या अपघातात फिर्यादी यांच्या आत्याचा मुलगा सौरभ इंदलकर हा गंभीर जखमी करून त्याचा मृत्यू कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद सुरज कदम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे करीत आहेत.







