केडगाव : सध्या देशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे असताना बरेचसे नागरिक, तरुण तरुणी घरात असून चिंतेत आहेत. त्यामुळे फसव्या लिंक पाठवून, नोकरीचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर त्यांना कॉल करून गंडविण्याचा प्रयत्न भामटे करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
मंगळवार (दि.18) रोजी दौंड तालुक्यातील एकेरीवाडी गावातील एका तरुणासोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. घडलेला प्रकार असा की, गावातील एका तरुणाने गावातील ग्रुपवर प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना apk. या नावाने एक लिंक ग्रुप वर फॉरवर्ड केली होती. त्यात या लिंक वर गावातीलच एका तरुणाने काहीतरी सुविधा मिळतील या हेतूने क्लिक केले. अपेक्षेप्रमाणे त्याने हे ॲप डाऊनलोड केले आणि आणि इंस्टॉलही केले. त्यानंतर गुगल सर्व्हिसेस अनेबल केले आणि त्यानंतर लगेचच काही कळण्याच्या आत संपूर्ण मोबाईलचा ताबा घेतला गेल. फोन पे वरील संपूर्ण पैसे काही समजण्याच्या आतच त्याच्या बँक खात्यातून कट झाले. अश्या अनेक घटना खास करून खेडेगावात अनेकांच्या बाबतीत घडत असून हे एक नवीनच संकट मोबाईल धारकांवर ओढवले आहे.
त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून कुठलीही लिंक अथवा कॉल आल्यास त्याला थारा देऊ नका. फसव्या लिंकवर क्लिक केले तर आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
भामट्यांचे हे आहेत नवनवीन फंडे
प्रधानमंत्री बेरोजगार योजनेच्या नावाखाली दहावी पास व नोकरी नसणाऱ्यांना साडेतीन हजार रुपये मिळतील असे आमिष : (http://bit ly/pradhanmantrI-berojgar-bhatta-yojnaa) लिंकद्वारे दाखवले जाते.
महिन्यांकरिता
जिओ कंपनीतर्फे भारतातील सर्व नागरिकांना 498 रुपयांचे फ्री रिचार्ज आमिष दाखवून (https//jiorechargenew. online) या लिंकद्वारे फसवणूक केली जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला 25 हजार रुपयांचे आमिष दाखवून (http:pmyojna.ssctechnical com) या लिंकद्वारे फसवणूक केली जाते.
अशाच पद्धतीचे नानाविध फंडे वापरून भामटे गंडविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
अनोळखी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी लिंकसोबत असलेली फाइल डाऊनलोड करू नका. कोणतेही अनोळखी ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नका. फसवणुकीचा संशय येत असेल तर आपण जवळच्या सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क करा किंवा (www.reportphshing.in), (www.cybercrime.gov.in) यावर कळवा. ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी खात्री करा, शासनाच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून अथवा आकाशवाणीवरून ॲप्स आणि वेबसाईटबाबत सांगितले जाते. त्या गोष्टींवरच विश्वास ठेवा. कोणतेही ॲप, वेबसाईट शासकीय आहे किंवा नाही याची खात्री करा. त्यासाठी अबाऊट इन्फोमध्ये जा आणि माहिती घ्या. रिव्ह्यू वाचा, ॲप किंवा वेबसाईट खरी की खोटी हे त्यावरून समजते. कोणतेही ॲप डाऊनलोड करताना परमिशन्स जास्त प्रमाणात मागत असल्यास सावध राहा; कारण शासकीय ॲप जास्त परमिशन्स मागत नाहीत.
– आकाश शेळके- पोलिस उपनिरीक्षक, यवत