पुणे : पुण्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव बुलेट घसरुन युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास कौन्सिल हाॅल रस्ता येथे घडली आहे. अर्पित शर्मा (वय-२२, रा. कोरेगाव पार्क) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दत्तात्रय सुळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेटस्वार अर्पित आणि त्याचा मित्र रोहित शर्मा हे कौन्सिल हाॅल परिसरातून भरधाव वेगाने निघाले होते. बुलेटचालक अर्पित याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनावर बुलेट जोरदार आदळली. या अपघातातील बुलेटवरील सहप्रवासी युवक रोहित शर्मा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात अर्पितचा मृत्यू झाल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. भरधाव वेगात नियंत्रण सुटल्याने शहरातील एरंडवणे आणि कौन्सिल हॉल रस्ता परिसरात झालेल्या अपघातात बुलेटस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, एरंडवणे भागातील भरतकुंज परिसरात २३ ऑक्टोबर रोजी बुलेटवरील नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. या अपघातात बुलेटस्वार महाविद्यालयीन युवक यश कमलेश दहिवळ (वय- १७, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) याचा मृत्यू झाला होता. या अपघातात पादचारी श्रीकांत दातार (वय- ८६) आणि जयराज राजेश हुलगे (वय-१८, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) हे जखमी झाले होते.