पुणे : पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयूर नायडू असं १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी १ ते २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्यात अनेक जणं कपडे धुण्यासाठी येत आहेत. आज दुपारी मयूर हा त्या ठिकाणी गेला होता. तिथेच जवळ असलेल्या डबक्यात तो उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच अनेक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर मयुरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून उत्तमनगर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनेकजण कपडे धुण्यासाठी धरणाजवळ असलेल्या डबक्यात येत असतात. यावेळी अनेक महिला आपल्यासोबत मुलांना देखील घेऊन आल्या होत्या. मात्र, मयूर हा कोणासोबत त्या ठिकाणी गेला होता हे अद्याप समजू शकलेले नाही. पण, तो डबक्यात पोहोण्यासाठी उतरला होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला आहे. आपला मुलगा अचानक सोडून गेल्याने त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.