पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मुसळधार पावसाने झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बिबवेवाडीतील पोकळे वस्ती परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
योगेश ज्ञानदेव वानेरे (वय-29, रा. सध्या रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी, मूळ रा. वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास योगेश वानेरे आणि त्याचा मित्र सुमीत बगाडे ओटा वसाहतीतील महादेव मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी अचानक झाडाची मोठी फांदी तुटली आणि योगेशच्या डोक्यात पडली. या घटनेत योगेश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेत योगेशचा मित्र सुमीत थोडक्यात बचावला.