पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाधनगृहाजवळ तरुणीला अडवून असभ्य वर्तन करून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. हि घटना खासगी वित्तीय संस्थेतील कंपनीत घडली आहे. या प्रकरणी एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून व्यवस्थापक शुभम दुबे (वय- ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दुबे एका प्रसिद्ध खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक आहेत. येरवडा भागातील आयटी पार्क परिसरात कंपनीचे मोठे कार्यालय आहे. पीडित तरुणी ही वित्तीय संस्थेत कर्मचारी आहे. तरुणी प्रसाधनगृहात जाताना दुबे तिचा पाठलाग करत असे. त्यावेळी त्याने तरुणीला अडवून असभ्य वर्तन करून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी देखील केली आहे. तरुणीने नकार दिला असता, मागणी पूर्ण न केल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, याबाबत तरुणीने कंपनीतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली होती. मात्र, समितीने तरुणीच्या तक्रारीची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आरोपी व्यवस्थापकाने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिला असाह्य झाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी शुभम दुबेने तरुणीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर-पाटील करीत आहेत.