पुणे : पालखी सोहळ्याला आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. आरोपी महिलेला हडपसर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पळ काढला होता. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला छत्रपती संभाजीनगर परिसरातून तबत घेतले आहे. धुरपता अशोक भोसले (वय-31 रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात पालखी सोहळ्यात दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरलेल्या धुरपता भोसले यांना हडपसर पोलिसांनी 3 जुलै रोजी अटक केली होती. तिला तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीतून हडपसर पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आणले होते. मात्र, पोलिसांचे लक्ष चुकवून आरोपी महिला पोलीस ठाण्यातून फरार झाली होती.
दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी धुरपता भोसले रिक्षातून मुंढव्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. नगर रस्ता परिसरातून ती बसने छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. टाकळी गावातून धुरपता भोसले हिला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास हडपसर पोलीसकरत आहेत.