पुणे : पुण्यातील औंध परिसारत एक संतापजनक घटना घडली आहे. खेळत असताना लहान मुलांमध्ये भांडण झाली. याच कारणावरुन मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. चार जणांच्या टोळक्याने एका महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी ९ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास औंध येथील पिनाक गंगोत्री सोसायटीमध्ये घडला आहे.
याप्रकरणी रत्ना बबलु यादव (वय-३६ रा. पिनाक गंगोत्री, नागरस रोड, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आएशा महंमद उमर शेख (वय-५०), आफ्रिन उर्फ गुड्डो अजिज शेख (वय-३०), सलमान मंहमद उमर शेख (वय-२८), फर्जिन उमर शेख (वय-२६ सर्व रा. पिनाक गंगोत्री, नागरस रोड, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,रत्ना यादव आणि आरोपी एकाच इमारतीत राहतात. रत्ना यादव आणि आरोपी यांची मुले इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी रत्ना यादव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना सीआरपीसी ४१ प्रमाणे नोटीस दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करत आहेत.