लोणी काळभोर : पुणे सासवड रस्त्यावर भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल माऊंट व्हिव समोर शुक्रवारी (ता.16) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका दुचाकी चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम गोपाळ मुर्म (वय 20, गाव भैरवपुर थाना जामा जि. दुमका राज्य झारखंड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी सुरेश टोकारे (वय 23, रा. थिटे वस्ती, खराडी गाव, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व पुनम मुर्म हे दुचाकीवरून पुणे सासवड रस्त्यावरून पुण्याच्या दिशेकडे चालले होते. आरोपी हा दुचाकी चालवीत होता. तर पूनम या आरोपीच्या पाठीमागे बसल्या होत्या. आरोपी हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात दुचाकी चालवीत होता.
दरम्यान, दिवेघाट उतरुन त्यांची दुचाकी वडकी येथील हॉटेल माऊटंन व्हिव समोर शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास आली असता, आरोपीच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पुनम मुर्म या खाली पडल्या. या अपघातात पूनम या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
पूनमला खाली पाडून, तिच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.