पुणे : पुण्यातील येरवड्यातील आयटी पार्क परिसरातील एका प्रसिद्ध फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी करत तिला शरीर सुखाला तयार न झाल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत महिलेने कंपनीतील कमिटीकडे तक्रार केली होती.
मात्र, कमिटीने हे प्रकरण दाबले. त्यामुळे पुन्हा आरोपीने सादर महिलेस त्रास देण्यास सुरूवात केली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दुबे (वय ३४) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत ३२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम दुबे हा फायनान्स कंपनीत असोसिएट क्लस्टर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर, पिडीत महिला या कंपनीत नोकरीस आहेत. ही कंपनी एक प्रसिद्ध फायनान्स क्षेत्रातील आहे. हे कार्यालय येरवड्यातील आयटी पार्क परिसरात आहे. दरम्यान, पिडीत या कंपनीतील वॉशरूमला जात असताना शुभम वारंवार पाठलाग करत असत. तसेच पाठलाग करून त्यांना वॉशरूमला एवढा वेळ लागतो का ? अशी विचारणा करत असे. त्यांना उघड-उघड शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. नकार दिल्यानंतर मानसिक त्रास देत होता.
या त्रासाला कंटाळून त्यांनी कंपनीच्या कमिटीकडे तक्रार देखील केली होती. मात्र, कंपनीने तक्रार दडपून ठेवली. त्यामुळे पुन्हा शुभमने त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. तसेच, शारिरीक संबंधाला नकार दिल्याने त्यांना कामावरून काढण्याची धमकी देखील दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.