हडपसर : हडपसर येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकरी महिलेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. कमल सोपानराव बोरकर (वय-६५) असे निधन झालेल्या वारकरी महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी १५ जुलै रोजी अकलुज जवळील तोंडले-बोंडले येथे पालखी सोहळ्यात घडली. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी व सून नातवंडे असा परिवार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, कमल बोरकर या हडपसर येथील श्री गुरूदत्त भजनी मंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्या मुळच्या नारायणपूरच्या असून त्यांचे कुटुंब नोकरीनिमित्त हडपसरमधील पंधरानंबर येथे राहत होते. त्या पालखी सोहळ्यातील सत्संग दिंडी क्रमांक २२ मधून विठोबाची पायी वारी करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.
गेल्या १५ वर्षांपासून त्या पायी वारी करत आहेत. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात त्यांचे भजनीमंडळ आत्तापर्यंत भजनसेवा देत आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही त्या दींडीसोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. एकादशीला दोन दिवस बाकी असतानाच त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे, त्यांचे कुटुंब आणि सहकारी वारकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.