पुणे : पुण्यात रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यु झाला आहे. तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आशाबाई दत्तात्रय सांळुके (वय-५७, रा. शुक्रवार पेठ, टिळक रोड) असं अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. हि घटना पुणे-सातारा रोडवरील सहकारनगर येथील नातुबाग चौकात शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत विशाल दत्तात्रय सांळुके (वय-३८, रा. टिळक रोड, शुक्रवार पेठ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिश राजाराम गोरे (वय-३४, रा. राठवडे, कोंढणपूर) या बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सर्व नातेवाईक मोरे यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. लग्न लागल्यानंतर रात्री ते सर्व जण घरी जाण्यासाठी निघाले होते. फिर्यादींची आई आशाबाई व मुलगी ही रिक्षाने बालाजीनगर येथे जाण्याकरीता रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी स्वारगेटच्या दिशेने येणारी एक पीएमपी बस बीआरटीमधून आली.
कात्रजकडे भरधाव जाणार्या बसने आशाबाई व फिर्यादीची मुलगी प्रचिती यांना जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादीची आई आशाबाई सांळुके यांचा मृत्यु झाला. तर, मुलगी प्रचिती ही जखमी झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख करत आहेत.