राहुलकुमार अवचट
यवत : रात्रीच्या वेळी बंद केलेले परमिट बार हॉटेलची खिडकी, दरवाजे उचकटून रोख रक्कम व दारूच्या बाटल्या माल चोरीला जात असल्याच्या ५ घटना यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या होत्या. प्रत्येक घटनेत एक व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन चोरी करत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व घटनास्थळांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करणारा व्यक्ती हा चोरी करून दौंड-काष्टी बाजूकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. यावरून काष्टी परिसरातील मिळालेल्या माहितीच्या आधारे, आदित्य बाळासाहेव कवडे (वय २१, रा. कोळगाव मानमोटी घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यास ताब्यात घेत चौकशी केली.
यावेळी तो उच्चशिक्षित असून, यवत, बारामती, श्रीगोंदा परिसरातील हॉटेलच्या खिडक्या आणि दरवाजे उचकटून चोरी केली तसेच दुचाकी देखील चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकूण ३ लाख २२ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहोवळे, आसीफ शेख, अजित भुजबळ, निलेश शिंदे, राजू मोमीण, अतुल डेरे यांनी केली.