न्हावरे,ता.14 : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील पुण्याई मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (ता.13) दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान लग्नसमारंभ उरकल्यानंतर दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी दाखल केल्या आहेत.

ऋषीकेश नितीन जाधव (वय 23, रा.नानगाव,ता.दौंड,जि.पुणे) यांनी संदीप दत्तात्रय शेलार,हर्षद बाळासो खळदकर व विशाल केशव खळदकर (सर्वजण रा.नानगाव, ता.दौंड,जि.पुणे) यांच्याविरुद्ध मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखला केली आहे. फिर्यादी ऋषीकेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार वरील आरोपींनी आमच्याकडे रागाने पाहतोस आणि कृष्णा लोंढे यांच्या घरी मदत करतो म्हणून रॉडने डोक्यात वार केला तसेच लाथाबुक्यांनी जबरी मारहाण करून शिवीगाळ केली.
तसेच दुसरी फिर्याद साक्षी संदीप शेलार (वय 22,रा.नानगाव,ता.दौंड, जि.पुणे) यांनी दाखल केली असून, साक्षी शेलार यांनी ऋषीकेश नितीन जाधव यांच्यासह संदीप उर्फ गुलाब पोपट खळदकर, विक्रांत उर्फ विकास पोपट खळदकर, महेश बापुराव इंगळे, अभिजित संजय खळदकर, शिवाजी चंद्रकांत खळदकर, निखील मच्छिंद्र निगडे, शेखर गोविंद खळदकर, सुशांत वसंत खळदकर, अनिकेत शंकर इंगळे (सर्व रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे) इत्यादी दहा जणांविरुद्ध विनयभंग, मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करून फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी साक्षी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा पती संदीप शेलार याने केडगाव पोलीस चौकीत तक्रार दिल्याच्या रागातून संबंधित नऊ आरोपींनी लग्नामध्येच फिर्यादीचा पती संदीप शेलार व फिर्यादी साक्षी शेलार यांच्यावर अचानक हल्ला केला. यामध्ये साक्षी शेलार यांचा विनयभंग केला असून, पती संदीप शेलार यांना दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिरूर पोलीस अधिक तपास करत आहेत. गावातील एका लग्न समारंभात जुन्या वादातून दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.







