दौंड (पुणे): नुकत्याच दहावी व बारावीचा विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल लागले असून दहावी व बारावी शालेय विद्यार्थ्यांचे अत्यावश्यक दाखले शालेय स्तरावर वाटप शिबिराचे आयोजन दि. १९ ते २१ मे कालावधीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार आनंद शेलार यांनी दिली आहे.
दौंड तहसील कार्यालयामार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांचे (जात, उत्पन्न, नॉन क्रिमीलेयर इत्यादी) वाटप शिबिराचे आयोजन येत्या सोमवार, मंगळवार व बुधवार दिनाक १९/०५/२०२५ ते २१/०५/२०२५ या दिवशी करण्यात आले आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांना शाळेमार्फत प्रस्तावित व तपासलेल्या अर्जांच्या आधारे त्यांचे दाखले वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी वेळेत उपस्थित राहून दाखले घेण्याचे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

शिबिराचे ठिकाण, वेळ आणि संबंधित शाळांसोबत समन्वय साधून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी व विद्यार्थ्याना आपले दाखले स्थानिक स्तरावर शाळेतच मिळावे उद्देशाने हे विशेष शिबिर घेतले जात आहे. यासाठी सध्या शैक्षणिक सुट्ट्या असल्या तरीही दाखले वाटप शिबिरासाठी शाळा कार्यालयीन कामकाज चालू ठेवण्याचे सूचना शाळा प्रशासन यांना देण्यात आल्या आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले आपले दाखले घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.
एक मे पासूनच अत्यावश्यक दाखले देण्यास प्रारंभ –

दौंड तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप कॅम्पचे नियोजन करण्यात आले असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दाखले वितरण करण्यात आले आहे.







