पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता थंडगार वडापाव दिल्याने तिघांनी विक्रेत्याला काचेची वरणी फेकून मारत तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील बालेवाडी परिसरात दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात तीन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय-४५, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंकुश कोंडिबा ढेबे (वय-२३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाशचंद्र जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साई चौकात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्या ठिकाणी दुपारच्या सुमारास ढेबे व त्याचे दोन मित्र सेंटरवर आले. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील चहाचा थर्मास खाली फेकून तो फोडला.
ढेबे याने काउंटरवरील काचेची बरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. यामध्ये जोशी यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला आहे. या घटनेनंतर तिघेही आरोपी त्या ठिकाणाहून पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून बाणेर पोलिस पुढील तपास करत आहेत.