वाघोली : वाघोली परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आठ दिवसांत वाघोली परिसरात दुसरा अपघात झाला आहे. दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना वाघोलीतील कटकेवाडी परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चैतन्य चव्हाण (वय-२०, रा. शिरूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य हा दुचाकीवर पुण्याच्या दिशेने जात होता. कटकेवाडी परिसरात त्याच्या दुचाकीला कारची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील शिक्षक असून, आई खासगी नोकरी करते.
दरम्यान, ३१ डिसेंबरला लोहगाव रस्त्यावर पाण्याच्या टँकरची धडक बसून भावडी येथील २२ वर्षीय मनोहर तोंडे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा चैतन्यचा बळी गेला. वाघोलीत अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. पादचारी व दुचाकीधारक भरघाव वाहनांच्या धडेकेचे बळी ठरत आहेत.