मंचर, (पुणे) : जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मोटारसायकलवर जाणाऱ्या तीन तरुण मित्रांना ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (ता. ७) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत श्रावणी हॉटेलजवळ घडली आहे.
प्रतीक तुकाराम गारे (वय-२१, रा. हिवरे, ता. जुन्नर), तेजस मारुती घोडे (वय-२१, रा. बोरघर, ता. आंबेगाव) व करण ज्ञानेश्वर ढंगले (वय-१८, रा. ढेंगळेवाडी, ता. जुन्नर) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
याप्रकरणी ट्रॅव्हल्स बस चालक राजेशकुमार भोलुराम गुजर (रा. पुरोहित काबास, सिखर, राजस्थान) याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुकाराम जानकु गारे यांनी बसचालकाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी प्रतीक, तेजस व करण हे तीन मित्र मंचरवरून पुण्याच्या दिशेला मोटरसायकल (एमएच १४ एचएल ६९०१) वरून जात होते. पाठीमागून भरधाव आलेल्या राजवाडी ट्रॅव्हल्स बसने (आरजे २३ पीबी २७११) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर बस चालक राजेशकुमार गुजर पळूने चालला होता. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून चालक गुजरला पकडून पोलीस अविनाश दळवी, विनोद जांभळे, प्रणव उकिरडे, यशवंत यादव यांच्या ताब्यात दिले. तीन मित्र गणेशोत्सवासाठी पुण्याला जात होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करत आहेत.