पुणे : पुणे रेल्वे स्थानकाजवळील घोरपडी यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. जवानांनी एक तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेत आगीत डबा जळाला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात रेल्वेगाड्या थांबविण्यात येतात. यार्डात रेल्वे गाड्यांची स्वच्छता केली जाते. मध्यरात्री दोनच्या सुमारास जंक्शन यार्डात थांबलेल्या रेल्वेच्या एका डब्यात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
दरम्यान, रेल्वे यार्डात थांबली असल्याने प्रवासी नव्हते. आगीत रेल्वेचे अन्य दोन डबे जळून खाक झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, याठिकाणी गर्दूल्यांचा व भिकारी तसेच अन्य लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो.