शिरूर : शिरूर तालुक्यात एक भाषण अपघाताची घटना समोर आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कोपीमध्ये भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कोपीत झोपलेले ऊसतोडण कामगार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास नीर्वी येथील कणसे वस्ती येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरवरला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. गणपत कचरू वाघ (वय-४६ वर्ष), शोभा गणपत वाघ (वय-४१ वर्ष दोघे रा. ममदापुर, ता. येवला, जि. नाशिक) असं मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दीपक गणपत वाघ (वय-19 वर्षों, धंदा मजुरी, रा. ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राहूल अण्णा सोनवणे (रा .निर्वि, ता. शिरूर) असं अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वी येथील कणसे वस्ती येथे कॅनल पट्टी जवळ फिर्यादी यांच्या आई-वडिलांची कोपी असून ते ऊस तोडणी करिता या भागात आले होते. १५ डिसेंबर रोजी जेवण करून मयत पती-पत्नी त्यांच्या कोपीमध्ये झोपले होते. त्यावेळी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर नंबर एम एच १२ ई बी ४५५८ निष्काळजीपणाने, भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांचे आई-वडील राहत असलेल्या कोपीत घातला.
या घटनेत ट्रॅक्टरचे चाक फिर्यादी यांचे वडिल गणपत वाघ यांच्या पोटावरून गेल्याने तसेच आई शोभा वाघ यांच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शिरूर पोलिसांनी फिर्यादीवरून ट्रक ड्रायव्हर याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहेत.