यवत(पुणे): जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व 1 लाख 255 व तडजोडचे 38 हजार 570 असे एकूण 1 लाख 38 हजार 825 दावे निकाली काढण्यात आले आहेत.
यावेळी लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली 8 हजार 819, तडजोड पात्र फौजदारी 31 हजार 537, वीज देयक 329, कामगार विवाद खटले 18, भुसंपादन 111, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण 163, वैवाहिक विवाद 74, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट 1 हजार 994, इतर दिवाणी 514, इतर 2 हजार 673, महसूल 7 हजार 731, पाणी कर 84 हजार 860, ग्राहक वादविवाद 2 अशी एकूण 1 लाख 38 हजार 825 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 97 हजार 644 प्रलंबित प्रकरणांमधून 38 हजार 570 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात 320 कोटी 68 लक्ष 12 हजार 407 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व 2 लाख 42 हजार 987 दाव्यापैकी 1 लाख 255 दावे निकाली काढण्यात येऊन 256 कोटी 70 लाख 98 हजार 749 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण 1 लाख 38 हजार 825 प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन 577 कोटी 39 लाख 11 हजार 156 रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.
पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली असून या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.