कात्रज, (पुणे) : कात्रज येथील जांभूळवाडी दरीपुलाजवळ कोळेवाडी महादेव मंदिराजवळ असणाऱ्या ओढ्यामध्ये एका चिमुकलीचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, कात्रज अग्निशमन दलाकडून संध्याकाळी सहा वाजता सदर मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. माधुरी रघुनाथ रांजणे (अंदाजे वय ४ वर्षे, रा. कोळेवाडी), असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माधुरीचे आई-वडील हे मोलमजुरी करतात. माधुरी ही बाहेरगावी असते, मात्र ती चार दिवसांसाठीच आई वडिलांकडे कोळेवाडी येथे आली होती. त्यावेळी माधुरी तिच्या आईसोबत कोळेवाडी येथील महादेव मंदिराशेजारी असणाऱ्या ओढ्यावर गेली होती. आई कपडे धुत असताना पातेले ओढ्यामध्ये वाहून गेले.
त्यावेळी ते घेण्यासाठी आई गेली असता मुलगीदेखील तिच्या पाठीमागे गेल्याने वाहून गेली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन जवानांनी शोधकार्य सुरू करत मुलीचा मृतदेह सायंकाळी सहाच्यादरम्यान बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.