लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून (ता. २१) सुरुवात झाली. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या केंद्रावर १ हजार विद्यार्थ्यांनी आज इंग्रजीचा पहिला पेपर दिला, अशी माहिती केंद्र संचालक अर्जुन कचरे यांनी दिली.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी असते. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील परीक्षा केंद्रावर प्राचार्य सीताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी उपकेंद्र संचालक जयदीप तिकोणे, एल. बी. खटके, संतोष वडर, सदानंद साळुंखे, पर्यवेक्षिका रेखा पाटील, कलाशिक्षक पराग होलमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १०२३ विद्यार्थी बसले आहेत. पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे ४७४ विद्यार्थी, चिंतामणी विद्यालय थेऊर येथील २५, एमआयटी येथील २६५, एंजेल हायस्कूलचे ७५ तर वडकी येथील मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या १८४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये कला शाखेचे २४७, वाणिज्य शाखेचे १८९, विज्ञान शाखेचे ५१८, तर व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेचे ६९ विद्यार्थी असे एकूण १०२३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
या केंद्रावर १०२३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी बसले आहेत. पैकी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर १०१२ विद्यार्थी देणार होते. त्यातील १ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर १२ विद्यार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती केंद्र संचालक अर्जुन कचरे यांनी दिली
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप जोगदंड, अंमलदार सूरज कुंभार, प्रवीण सपकाळ यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.