संदीप टूले
दौंड : शहरातील गोड राऊंड चौकातून बोरावके नगर रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीवरील दहा वर्षांच्या मुलीचा ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. मुलगी आपल्या काकासोबत आईस्क्रीम घेऊन घरी परतत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाने तिच्यावर घाला घातला. या घटनेमुळे मुलगी राहत असलेल्या वेताळनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातामुळे शहरातून होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोहमार्ग पोलीस कर्मचारी संजय बापूराव थोरात यांची मुलगी मृणाल संजय थोरात (वय १०, रा. वेताळ नगर, दौंड) हिचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी काका संतोष बापूराव थोरात (रा. वेताळ नगर, दौंड) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे भाऊ संजय थोरात हे वेताळनगर येथे एकत्र राहतात. १ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपली पुतणी मृणाल हिच्यासह दुचाकीवरून येथील अण्णा भाऊ साठे उद्यानासमोरील गोकुळ हॉटेलमध्ये आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते. आईस्क्रीम घेऊन ते दोघे गोल राऊंड ते कुरकुंभ रस्त्याने घरी जात असताना गोल राऊंडजवळील पेट्रोल पंपासमोर पाठीमागून ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना ओव्हरटेक केले. या ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्याने ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन नंबर ट्रॉलीचा फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धक्का लागला. त्यामुळे फिर्यादी व दुचाकीवरील त्यांची पुतणी खाली पडले. या वेळी ट्रॉलीचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गोल राऊंड ते बोरावकेनगर महामार्ग रस्त्याचे काम चालू असताना या मार्गावर सेवा रस्ता न केल्याने, येथे अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्याचे काम चालू असताना व या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी जमीन राज्य राखीव पोलीस दलाचीच असतानाही सेवा रस्ता का केला गेला नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावर वेळोवेळी अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. एखाद्या अपघातामध्ये प्राणहानी झाली की त्या दिवसापर्यंत नागरिक संताप व्यक्त करतात, पुन्हा तीच परिस्थिती. त्यामुळे या मार्गावर सेवा रस्ता करून प्राणहानी टाळावी अशी मागणी होत आहे.