पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये शाळेत मुलींसोबत विनयभंग करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलेली समोर येत आहे. शाळेतील काही विद्यार्थिनींचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संतप्त घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली आहे.
अनिल महादेव शेळके (वय. 52, रा. सोने सांगवी, ता. शिरूर, पुणे) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शेळके ही व्यक्ती शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शेळके हा शाळेतील मुलींसोबत गैरवर्तन करणे, मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत गैर कृत्य करत असताना आरोपी शिक्षक अनिल शेळकेने मुलींना याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. मात्र काही विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितलं.
याप्रकरणी विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर पालक, शाळेतील इतर शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी व गावातील पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून संबंधित शिक्षकाबद्दल तक्रार सांगितली. याप्रकरणी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे तपास करत आहे.