-बापू मुळीक
सासवड : 2019 पासून पुरंदर उपसा जलसिंचन योजना राजकारणाविरहित आणि कार्यक्षमतेने चालविल्याने लाभ क्षेत्रातील ऊसाची उत्पादन 50 हजार टनावरून सात लाख 25 हजार टनावर गेले आहे. मल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुरंदर मधील शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच हक्काचा साखर कारखाना उभारण्यात येणार असून, जानेवारीपासून आपल्या साखर कारखान्यात आपल्या उसाचे गाळप होणार आहे. सिताफळ इस्टेटच्या माध्यमातून पुरंदरच्या सीताफळाला जिओ टॅगिंग मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, विविध शेतमालांच्या प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे. असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले.
माळशिरस ( ता. पुरंदर) येथे झालेल्या कोपरा बैठकीत आमदार संजय जगताप बोलत होते. त्यांनी बेलसर, साकुर्डे, माळशिरस येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रचार प्रमुख सुदाम इंगळे, विजय कोलते, सरपंच आरती यादव यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
माळशिरसचे माजी उपसरपंच माऊली यादव म्हणाले, विमानतळ, गुंजवणी, राष्ट्रीय बाजाराच्या गप्पा मारणार्यांनी यातील एकही काम केले नाही. दहा वर्षांत पुरंदर उपसाची फुटभर ही लाईन वाढवली नाही. या उलट कोट्यवधींच्या विकास कामांना स्थगिती आणण्याचे काम केले. राज्यात परिवर्तनाची लाट असून, खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, त्यांच्या विचाराच्या आमदार संजय जगताप यांच्या मागे उभे राहण्याची आपली जबाबदारी आहे.
माजी आमदारांचा 2019 मध्ये 31 हजाराहून अधिक फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनी पुरंदर तालुक्यातील 32000 मतदार बोगस असल्याचा आरोप करीत, मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा दुरुपयोग करून, प्रशासनाला हाताला धरून माझ्यासह तालुक्यात पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असणाऱ्या अनेक गावच्या आजी-माजी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यसह 32 हजाराहून अधिक मतदारांना जानेवारी महिन्यात नोटीस बजावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले. सर्वसामान्यांना मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांना सुखदुःखात सहभागी नसणाऱ्यांना मुंबईचा रस्ता दाखवा, असे आमदार संजय जगताप म्हणाले.