दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर नगरपरिषद हद्दीतील ९०० स्क्वेअर फुटाच्या आतील सर्वच बांधकाम मालमत्ता धारकांची शास्तीकर माफ करावी, करामध्ये सवलत मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या सीमाताई कल्याणकर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सासवड (जि. पुणे) येथे झालेल्या मेळाव्यामध्ये निलम गोऱ्हे यांना सरसकट शास्तीकर माफीसाठी कर सवलतीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. सीमा कल्याणकर यांनी सांगितले की, इंदापूर नागरी संघर्ष समितीच्या मागणीनंतर नगरपालिका प्रशासनाने शहरातील ९० चौरस मीटरच्या आतील घरांना ५० टक्के शास्तीकर माफ केला आहे. ११४ जणांची नावेही प्रसिद्ध केली आहे. पण बाकी मालमत्ता धारकांचाही फायदा व्हावा, यासाठी नगरपालिका प्रशासनाने ९०० स्क्वेअर फूटाच्या आतील बांधकामांची लवकरात-लवकर मोजणी करावी, असे कल्याणकर यांनी सांगितले. कल्याणकर पुढे म्हणाल्या की, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख अॅड. गीतांजली ढोणे यांनीही या प्रश्नावर आपण लक्ष घालून इंदापूरकरांना न्याय देणार आहे.
शास्तीकरात ५० टक्के सवलत दिल्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, इंदापूर नागरी संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा. कृष्णा ताटे, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण यांचे सीमा कल्याणकर यांनी आभार मानले. निवेदन देतेसमयी इंदापूर तालुका युवा सेना प्रमुख अण्णा काळे, महिला तालुका प्रमुख रुपाली रासकर, इंदापूर महिला शहर प्रमुख निर्मला जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.