पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलच्या गेटसमोर झाला. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहा पांडुरंग जोशी (वय-२३, रा. मुलुंड चेक नाका, जनता विकास नगर, मुलुंड, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत महेश दत्तात्रय लोखंडे (वय-३९, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी गुरुवारी (ता. १५) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन एमएच १४ सीपी ३१८१ ट्रक चालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश लोखंड व नेहा जोशी हे दोघे मंगल साई इंजीनियरिंग प्रा. लि. कंपनीत काम करतात. बुधवारी सायंकाळी ते दोघे कंपनीमधून दुचाकीवरुन (एमएच १४ ७२२५) राहत्या घरी आळंदी हनुमान वाडी ते चाकण मार्गे जात होते. इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलच्या गेटसमोर ते आले असता, आरोपीने ट्रक निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून पाठीमागून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेली नेहा जोशी ही गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिसोदे करीत आहेत.