खेड शिवापूर : पीएमपीएमल बसने गिर जातीच्या गाईंच्या कळपाला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन गाई दगावल्या असून, इतर गायी या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना कोंढणपूर परिसरात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोंढणपूर ते अवसरवाडी ही पीएमपीएमएल बस कोंढणपूर येथून आज सकाळी पावणेसात वाजता पुण्याकडे निघाली होती. याचवेळी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी कोंढणपूर रस्त्यावरील सागराची ताल येथे हा गीर गाईचा कळप चरण्यासाठी रानात निघाल्या होत्या. गायींचे मालक तुकाराम नामदेव मुजुमले हे असून गायींच्या मागे एक कामगार होता.
दरम्यान, भरधाव पीएमपीएमल बस गाईंच्या कळपात घुसल्याने अपघात झाला या अपघातात दोन गाई दगावल्या असून, इतर गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. काही गाईंचे पाय मोडले आहेत, तर काहींचे पायाचे पंजे तुटून पडले आहेत. एका गायीचे शिंग तुटलेले दिसून आले. यामधील काही गायी गाभण असल्याचे अजय मुजूमले यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे नवनाथ राठोड हे घटनास्थळी दाखल झाले असून तपासणी सुरू आहे.