भिगवण : येथील कोल्हापुरी चप्पल साठी प्रसिद्ध असणारे चप्पल व्यावसायिक भिगवण येथील आपले दुकान बंद करून घरी जात होेते. त्यावेळी कोंढार चिंचोली नजीक त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची जोराची धडक बसून कोल्हापुरी चप्पल व्यवसायिक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
चांगदेव बापूराव कारंडे (वय 40 रा. रामवाडी ता. करमाळा जि. सोलापूर) असे चप्पल व्यावसायिकाचे नाव आहे. तर समोरील दुचाकी वरील दोन व्यक्ती जखमी झाली त्यांची नावे समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती चांगदेव कारंडे यांचे भिगवण येथे कोल्हापुरी चप्पलचे दुकान असून ते रामवाडी (ता.करमाळा) गावचे रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे सायंकाळी आपले दुकान बंद करून भिगवणवरून आपल्या रामवाडी येथील घरी त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 45के 5035) निघाले होते. आठ वाजण्याच्या दरम्यान कोंढार चिंचोली नजीक पोहचले असता जिंती वरून भिगवण कडे येणाऱ्या दुचाकीची (नंबर माहीत नाही) जोराची धडक त्यांना बसली. ही धडक इतकी जोराची होती की या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी आपल्या ॲम्बुलन्स मधून जखमी चांगदेव कारंडे यांना भिगवण येथील मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर समोरून धडक येणाऱ्या दुचाकी वरील दोन जण गंभीर जखमी झाले असे माहिती मिळाली आहे. सदरील अपघात शनिवार काल (दि.31) रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला असून कोल्हापुरी चप्पल व्यवसाय चांगदेव कारंडे यांच्या निधनाचे अपघाती वृत्त समजल्याने रामवाडी व भिगवण बाजारपेठेवरती शोककळा पसरली.