पुणे : पुण्यात एटीएम मशिनमध्ये पट्टी लावून पैसे काढणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चोरी करताना सिक्युरिटी अलार्म वाजल्यानंतर, खासगी सुरक्षा रक्षक आणि तेथे असलेल्या वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार केळकर रोडवरील एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. संतोष ब्रिजेश कुमार (वय २४, सध्या रा. चिखली, मूळ रा. प्रतापगढ) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सदाशिव पेठेतील ५३ वर्षीय व्यापाऱ्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमक काय घडलं ?
एका व्यक्तीने एटीएम मशिनमधून पैसे काढले. पैसे मोजले जात असल्याचा आवाजही आला. खात्यातून पैसे वजा झाल्याचा मोबाईलवर मेसेजदेखील आला. मात्र, एटीएममधून पैसे मिळाले नाही. तेव्हा संबंधित व्यक्तीने आपल्या मुलीला तेथे थांबवून बँकेत तक्रार करायला गेले. दरम्यान, त्याचवेळी दोन व्यक्ती आत आल्या. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मशिनसोबत छेडछाड होत असल्यामुळे सिक्युरिटी अलार्म वाजला. तो ऐकून सुरक्षा रक्षक व रोडवरील वाहतूक पोलिस तिकडे धावत आले. हे पाहून त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिसांनी दुसऱ्याला पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी आहेत. पैसे काढण्यासाठी ते एटीएममध्ये गेले. त्यांनी पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले. १० हजार रुपये काढण्यासाठी एन्ट्री केली. त्यानंतर एटीएम मशिनमधून पैसे मोजले जात असल्याचा आवाजही आला. त्यांना मोबाईलवर मेसेजही आला. परंतु पैसे बाहेर आले नाहीत. त्यांनी कार्ड बाहेर काढले. आपल्या मुलीला बोलावून घेतले. तिला सांगितले, ‘तू इथे थांब. मी बँकेत तक्रार करून येतो.’ ते बँकेत गेले असतानाच मुलीचा फोन आला. तिने काय घडले ते सांगितले.
फिर्यादी बाहेर गेल्यानंतर दोघे जण आत शिरले. त्यांनी पैसे काढण्याच्या ठिकाणी पट्टी लावली होती. त्यामुळे फिर्यादी यांचे पैसे अडकले होते. ते पैसे ते दोघे जण काढत असताना एटीएममध्ये काहीतरी बदल करत असल्याने सिक्युरिटी अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्याबरोबर सुरक्षा रक्षक व रोडवरील वाहतूक पोलिस तिकडे धावले. अलार्म वाजल्याने घावरून दोघे जण बाहेर येऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. सुरक्षारक्षक व वाहतूक पोलिसांनी संतोष कुमार याला पकडले.